स्लॅमबुक........भाग १-३
*स्लॅमबुक* ✍✍ *GBS*
मार्च महिन्यात होणाऱ्या बारावी परीक्षांच्या तारखांचे वेळापत्रक कॉलेजच्या गेट जवळ शिपाई मामांनी बोर्डावर लावले होते.तस परीक्षांचीही तयारी आमची झाली होती..की नाही हे आम्हालाचं माहीत नव्हतं.इंग्रजी सोडलं तर भावा आपल्याला कोणत्या विषयात अडचण नाही असं म्हणणारे आम्ही मराठीच्या सराव परीक्षेला काठावर पास झालो होतो.सगळं काही अभ्यास आणि अभ्यासा संबधी गप्पा, गोष्टी,पाठांतर सुरू असतांनाच हे वेळापत्रक येऊन धडकलं होतं.
वेळापत्रक आणि कोणाचा पेपर कधी?
कोणत्या पेपरला कोणाला किती अभ्यासाला दिवस मिळणार ?
ह्या चर्चेला आता उधाण आलं होतं.
मोजून परीक्षेसाठी ४० -४२ दिवस उरले असावेत....?
आणि अश्या वेळी जोशी सरांच्या मुलाने परीक्षेला किती दिवस राहिलेत आणि किती तास,किती मिनिटं हे सगळं काऊंट डाउन सुरू केलं होतं.
पण पोरं फार्मात असल्यावर जोश्या काही बोलायचा नाही ....?
सगळे समवयस्क होतो आणि ज्या जोड्या होत्या त्यात आवडी निवडी आणि त्यांची सांकेतिक नाव ही आम्ही ठेवलेच होते.आणि कुणाला काय नावं ठेवायचे तो विभाग माझ्याकडे होता.एक उदाहरण घ्यायचं म्हंटल तर आमच्या रुमवरचा प्रकाश कावळेला कॉमर्सची पूजा आवडायची.आणि पूजा मामीकडं राहायची म्हणून आम्ही पक्याला मामु म्हणायचं आणि तिला मामी असे सहा -सात जोड्या होत्या.त्यांची प्रकरणं काही पुढची नव्हती पण तुझ्यात जीव गुंतला इथपर्यंत असावीत.
आणि
सगळं काही अलबेल चालत असताना मामुनं आणि रम्यानं नवीनचं नाटकं काढली.आम्ही ज्या प्रगती बुक डेपोतुन वह्या,पुस्तकं, दोनवाले बॉल पेन घ्यायचो.त्या दुकानातून साठ रूपायवाली रंगीत संगीत वही आणायची अन विषयाच्या वही सारखी अनुक्रमणिका टाकून त्यात.....
माझं नाव.........?
माझा छंद.........?
माझा जन्म.......?
फोन नंबर आणि सतराशे साठ बाबी अन सर्वात शेवटी महत्वाचा मुद्दा.
.....
तुझ्या बद्दल.. .....?
आणि चार-पाच बऱ्या घरच्या पोरांनी त्या वह्या आणल्या अन त्या वह्या आता फिरू लागल्या,,
झालं का नाही तुझं?
लिहायला किती वेळ लागतो?
आणि हो तुझा घरचा फोन नंबर,पत्ता टाक आणि फोटो पण चिकटवं...
अश्या दोन तीन दिवसांच्या संभाषणानंतर ती वही सॉरी स्लमबुक आमच्या रूमवर यायचे...
ज्याच्यासाठी लिहिलंय त्यानेच वाचायचं?
दुसऱ्यांची स्लमबुक वाचत जाऊ नये?
स्वतःच स्लमबुक देऊन तेच वाचायचं?
असे अनेक प्रश्न आणि शंका ,विरोधाभास असतानाही पोरं होईल त्या अटीवर त्या मुलीनं लिहिलेलं वाचायचे आणि मग वर्गात चर्चा सुरू होईची...
समाज सेवेच्या कॅम्पला नंदया खूप चांगलं गाणं म्हणालास बरका.......
आणि नंदया भगव्या टीशर्टवर खूप जोरात दिसतोस हा?????
असं बोलून दिवसाची सुरुवात व्हायची.......
झक मारली वाटायचं यांना हातच्या चपात्या खाऊ घालून माझी वही वाचायला दिली.
पोरींना पोरांच्या बोलण्याचा अर्थ कळला की वाईट बघायच्या.....
शप्पत
पण काही फायदा पण नव्हता ?
कारण आपण पण त्यांची दोन वर्षात जाम खेचली होती.
मग मी सगळ्यांची संगत सोडून परीक्षेच्या पुढें काही दिवस जोश्या सोबत राहायचा निर्णय घेतला.आणि राहायला लागलो.गावाकडं अभ्यासाचं आणि परीक्षेचं नियोजन सांगून मेस लावायला सांगितली होती.आणि परीक्षेच्या आधी काही दिवस स्लमबुक प्रकरणापासून जोश्या सोबत अभ्यास जेवण सगळं सुरू झालं....आणि D.ED ला लागायचं म्हणून स्कोअरिंग विषय संस्कृत घेतलेला,तिथं जोष्याची मदत होऊ लागली.आणि तो शेवटच्या दिवसात यार बनला...कारण दोन वर्षात नंदकिशोर म्हणणारं एकच व्यक्तिमत्त्व होतं ते म्हणजे प्रसन्न जोशी त्याचं प्रसन्न हे नावं हे चार-दोन पोरनाचं माहिती होतं,पोरं-पोरी तर सर्रास मला नंदया नाहीतर नंदू असं म्हणायचे.
जोशींची आणि माझी चर्च्या होऊ लागली.की परीक्षेच्या तोंडावर काय ही पोरं स्लमबुक स्लमबुक कारायलेत.
क्रमशः १ कडून २ साठी