ओळखलंत का सर मला, पावसात आला कोणी
कपडे होते कर्दमलेले , केसावरती पाणी
क्षणभर बसला , नंतर हसला , बोलला वरती पाहून
गंगामाई पाहुनी आली , गेली घरट्यात राहून
माहेरवाशीण पोरी सारखी चार भिंतीत नाचली
मोकळ्या हाती जाईल कशी , बायको मात्र वाचली
भिंत खचली चूल विझली , होते नव्हते गेले
प्रसाद म्हणुनी पापण्यामध्ये पाणी थोडे ठेवले
कारभारणीला घेऊन संगे सर आता लढतो आहे
चिखलगाळ काढतो आहे , पडकी भिंत बांधतो आहे
खिश्याकडे हात जाताच हसत हसत उठला
पैसे नको सर जरा एकटे पण वाटला
मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा
पाठीवर हात ठेऊन फक्त लढ म्हणा !